भालचंद्र जुमलेदार
नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबारीचा खेळ करणाऱ्या डोंबारणीला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटारसायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागण्याची घटना घडली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर या महानगरांच्या वेशीवर असलेल्या शहरातील आरोग्यसेवेचा भाेंगळ कारभार यामुळे उघड झाला असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आसूडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला सोमवारी रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिच्या नवऱ्याने माहितीतील आशा वर्करला फोन केला होता. त्यांनी ॲम्ब्युलन्ससाठी फोन नंबर दिला; परंतु, समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. यामुळे काेणताही पर्याय नसल्याने त्याने मोटारसायकलला हातगाडी बांधून त्यात पत्नीला बसवून आसूडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयामध्ये महिलेला दाखल करण्यात आले. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पनवेलनजीकच्या शहरातच ही गंभीर घटना घडल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित महिला मूळची छत्तीसगढमधील रहिवासी आहे. जुलै महिन्यात ती पनवेलमध्ये आली. त्यानंतर तिची आशा सेविकांमार्फत नियमित तपासणी केली जात होती.
पनवेलमधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या घटनेशी संबंधित अहवाल माझ्याकडे आल्यावर या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. अंबादास देवमाने (जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड)