राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा, जागावाटपाचे २०१९चे सूत्र काँग्रेसला अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 09:10 AM2023-06-03T09:10:28+5:302023-06-03T09:10:52+5:30
आघाडीवर परिणाम होणार नसल्याचा दावा
मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा मतदारसंघांचे जागावाटप होताना २०१९ च्या निवडणुकीतील निकालाच्या आधारे होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपात काँग्रेसला दुय्यम जागा मिळण्याची शक्यता आहे.
२०१९ ची परिस्थिती व आताची परिस्थिती यात फरक आहे. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तीनही पक्ष एकत्र लढले तर भाजपचा पराभव करणे कठीण नाही. जागावाटपावरून आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणे प्रदेश काँग्रेसने सुरू केले आहे. राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच, पण आता या आघाडीत शिवसेनाही सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची काय स्थिती आहे याची चाचपणी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत शुक्रवारी २४ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य
४८ मतदारसंघाचा आढावा सुरू केल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
ग्राउंड रिपोर्ट तयार करणार
या आढावा बैठकीनंतर काँग्रेसची स्थिती चांगली असलेल्या मतदारसंघांची यादी तयार केली जाईल. जागावाटप करताना काँग्रेस या यादीचा आधार घेणार आहे. दोन दिवसांची आढावा बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे नेते राज्यभर दौरा करणार आहेत. आघाडीचे जागावाटप होण्याआधी लोकसभा जागांचा काँग्रेस नेते ग्राऊंड रिपोर्ट तयार करणार आहेत.