काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत, संवेदनशील सरकारने कामाला लागले पाहिजे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारला लगावला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लावा आणि जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारने राज्याला देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच मी हा विषय ताकदीने लोकसभेत मांडेन असे आश्वासनही त्यांनी दिले.
आरक्षणावर सरकारची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झाले पाहिजे. निर्णयप्रक्रियेचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. डीसीएम १ आणि डीसीएम २ यांना विचारावे, मुख्यमंत्र्यांना विचारावे. राष्ट्रवादी पक्ष मराठा, मुस्लिम, लिंगायत सर्वांच्या मागे आहे. या सरकारच्या निर्णयात स्पष्टता येत नाहीय. परंतू, राष्ट्रवादीच्या भूमिकेत सातत्य आहे, असेही सुळे म्हणाल्या.
एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आली आहे. पक्ष सोडा महाराष्ट्रही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. ती महिला शिक्षक होती, भाजप भ्रष्ट जुमला पार्टी सातत्याने अपमान करत असते, मित्रपक्षांनाही सवय लागलीय, अशी टीका सुळे यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यावर केली.
राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय काय? वैयक्तिक माझे फडणवीसांशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह मंत्रालय होते, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखले जायचे. ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतोय अशी टीका सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केली.
संदीप क्षीरसागर कुटुंबाच्या वेदना पाहा. जालन्यातील घटना, अमानुष पद्धतीनं महिलांना मुलांना मारलं, कोण जबाबदार? गृहमंत्रालय काय करतंय? असा सवालही सुळे यांनी केला. तसेच महायुतीत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला फडणवीस यांनी जाहीर केला यावरही सुळे यांनी मत मांडले. माध्यमांवर दाखवलेला फॉर्म्युला भाजपचा ठरलेला नाहीय. आमचा फॉर्म्युला ठरला की संजय राऊत, नाना पटोले सगळं सविस्तर सांगतील, असे सुळे म्हणाल्या.