महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:54 AM2024-06-08T06:54:39+5:302024-06-08T06:55:50+5:30

राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे; महामंडळांवरील नियुक्त्यांची शक्यता 

A series of challenges facing the Mahayuti; Many decisions will be made from expansion | महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

मुंबई : लोकसभा निकालात १५० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असल्याचे समोर आल्यानंतर महायुतीची चिंता वाढली आहे. पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवायची तर अनेक निर्णय महायुतीला करावे लागणार आहेत. त्यात कोणाच्या नेतृत्वात आगामी निवडणूक लढणार याची अधिकृत घोषणा करणे, पराभवामुळे झालेली नाराजी शमविणे, तिन्ही पक्षांना न्याय देऊ शकेल असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणे, अशी आव्हाने महायुतीसमोर आहेत.

 लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ झाल्याने निकालावरही त्याचा परिणाम झाला. ती चूक विधानसभेला होऊ नये याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जागावाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाच्या आधारे काही खासदारांना तिकिटे नाकारण्यासाठी भाजपने दबाव आणला, असा आरोप शिंदेसेनेच्या नेेत्यांनी केला होता. यावेळी हा वादच उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. एक-दोन आठवड्यात हा विस्तार झाला तर नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी तीन-साडेतीन महिनेच मिळतील. कारण त्यानंतर लगेच निवडणूक आचारसंहिता लागेल. विभागीय, जातीय संतुलन हे दोन घटक समोर ठेवूनच विस्तार केला जाईल, असे मानले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह ४३ इतकी राहू शकते. सध्या २९ मंत्री आहेत. याचा अर्थ आणखी १४ जणांना संधी दिली जाऊ शकते. शिंदेसेनेचे मंत्री संदीपान भुमरे औरंगाबादमधून निवडून आले आहेत, त्यामुळे ते मंत्रिपदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देतील. त्यामुळे आणखी एका मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो.
विविध महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्यांचा निर्णय लवकरच होईल अशीही शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

शिदेंच्या नेतृत्वातच विधानसभा लढणार?
फडणवीस यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभेची निवडणूक आम्ही लढवू, असे सांगत आहेत. भाजपचे दिल्लीतील नेतृत्व तिन्ही पक्षांच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा करून अधिकृतपणे तशी घोषणा करेल, अशी शक्यता आहे.

भाजपमध्ये बदल होतील का? 
प्रदेश भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बदलणार का याबाबतही उत्सुकता आहे. फडणवीस यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांना सरकारमध्ये राहून काम करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने तूर्त केलेली आहे.
फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चाही केली. परंतु, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तूर्तास उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ नका, असा सल्ला दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप करून तयारीला लागा, असे निर्देशही पक्षनेतृत्वाने त्यांना दिल्याचे कळते.
बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले तरी त्यांच्यासोबतचे काही पदाधिकारी बदलले जाऊ शकतात. काही नवीन चेहरे दिले जातील असे म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.   

Web Title: A series of challenges facing the Mahayuti; Many decisions will be made from expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.