नाशिक - उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत हे नाशिक, मालेगावात तळ ठोकून आहेत. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कुणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र मालेगावच्या सभेपूर्वीच ठाकरेंना धक्का बसला आहे. नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नाशिकमधील १५-२० महिला पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. या प्रवेशाबाबत एका महिला पदाधिकाऱ्याने म्हटलं की, उपऱ्या शिवसैनिकांना खरी शिवसेना माहिती नाही. बाहेरचे आणून पदाधिकारी बसवले जातात. शिवसेनेची ध्येय धोरणे माहिती नाही. ५० महिलांनी राऊतांना तक्रार केली. परंतु मर्यादा सोडून दिलेल्यांना बंधनं घातली पाहिजे अशी मागणी केली. परंतु जे नेते आहेत त्यांच्यासोबत राऊतांची देवाणघेवाणीचे व्यवहार असतील म्हणून कारवाई केली नाही. महिला आघाडीत राहून आमच्यावर शिंतोडे टाकून घ्यायचे नाहीत. त्यामुळे महिला आघाडीच्या माझ्यासह ३ जिल्हा संघटक, २ शहर प्रमुख, ३ उपजिल्हाप्रमुख शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच या सरकारने महिलांसाठी अर्थसंकल्पात अनेक योजना आणल्या. एसटी बसेसमध्ये ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली. एखादी महिला गरीब असली, झोपडपट्टीत राहत असली तरी तिलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानसन्मान देतात. हाच मानसन्मान आम्हाला महिला आघाडीत मिळत नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करतोय. आम्हाला मानसन्मानच नाही. नाशिकच्या नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. व्यासपीठावरून महिलांची लाली-लिपस्टिक काढली जाते, आज आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. त्यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते असंही प्रवेश करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.
उर्दुवर देशात बंदी आहे का?मालेगावमधील उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी पक्षाकडून मुस्लीम बहुल भागात उर्दू भाषेत बॅनर्स झळकावले आहेत. त्यावरून सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. त्यावर बोलताना संजय राऊतांनी हे भाजपा, खोकेवाल्यांच्या आयटी सेलचे काम आहे असा आरोप केला. त्याचसोबत उर्दू या देशाची भाषा नाही का? देशात उर्दूवर बंदी आहे का? कालच कुणीतरी जावेद अख्तरांचे कौतुक केले, आम्हीही केले. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी भाषा ही सुद्धा उर्दू आहे. ज्या जावेद अख्तर, गुलजार यांचे कौतुक करते ते आजही त्यांचे लिखाण उर्दूमध्ये करतात. हा जो काही प्रकार सुरू आहे तो लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर फाटलीय असं सांगत संजय राऊतांनी मालेगावमध्ये उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सचे समर्थन केले.