छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू, असं मत राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागपूरात ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत हा क्षण मी कधीही विसरु शकणार नाही, असे सांगितले.
लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता. विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला.
भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार-
आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.