Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत असून, महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. या घटनेनंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या कामाचे वाभाडेच काढले आहेत.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. ३५ फुटांच्या या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाकडून पुतळा उभारण्याचे काम करण्यात आले होते. पण, तो पुतळा पडल्याने आता कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराज आम्हाला माफ करा'
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुतळा कोसळल्यानंतरचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. आव्हाडांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे", असे टीकास्त्र आव्हाडांनी डागले आहे.
आव्हाड पुढे म्हणतात, "महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय? हा पुतळा उभा आणि हातात म्यानातून उपसलेसी तलवार असलेलाच का आहे? कुणालाच या पुतळ्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही का? हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते. आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा", असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून महायुती सरकार लक्ष्य
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. विरोधकांकडून वेगवेगळे प्रश्न पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात उपस्थित केले जात आहे. कंत्राटदाराचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला असून, मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून घाई केल्याचा आरोप केला आहे.