नवनीत राणा यांनी भाजपाच्या गोटात जात लोकसभेची उमेदवारी जरी मिळविली तरी देखील त्यांची डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. त्यांच्याविरोधात उभे राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एकीकडे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढावे लागत असताना त्यांना एनडीएतीलच नेत्यांशीही लढावे लागणार आहे.
एकीकडे बच्चू कडू आणि दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्यासोबतचे त्यांचे राजकीय वैर स्वस्थ बसू देणार नाहीय. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी राणांविरोधात अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे कडू यांनी देखील राणांचा प्रचार न करता चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देण्य़ाची घोषणा केली आहे. तसेच राणा यांना भाजपात आयात करून उमेदवारी दिल्याने भाजपातील छुपे विरोधक देखील नाराज असण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कडू यांनी मोदींच्या ४०० पारच्या लक्ष्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. अबकी बार ४०० पार ही घोषणा आहे. एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही, असे कडू म्हणाले आहेत. तसेच भाजपवरदेखील कडू यांनी टीका केली आहे. भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट मिळाले, एवढी लाचारी? ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तिकीट मिळाले आहे. कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचे हे एकदा निश्चित झाले पाहिजे, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असा इशारा कडू यांनी दिला आहे.