लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच त्यांचे चुलत बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ही चर्चा दोघांनी एकत्र येण्यासाठी नसेल तर त्याचे कारण खूपच वेगळे आहे. दोघे प्रत्यक्ष भेटतील की, फोनवरूनच चर्चा होईल हे अद्याप नक्की नाही.
उद्धव ठाकरे हे दादर येथे उभारल्या जात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवर दसऱ्याला जी भाषणे झाली त्यातील काही भाषणांच्या ध्वनिफिती उद्धव यांच्याकडे उपलब्ध नाहीत.
उद्धव ठाकरे यांना अशी माहिती आहे की, ज्या ध्वनिफिती त्यांच्याकडे नाहीत त्यांपैकी बहुतेक सर्व या राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. कारण, राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्याकाळी बाळासाहेबांची भाषणे ध्वनिमुद्रित केलेली होती. आता राज यांच्याकडील या ध्वनिफिती मिळवायच्या तर त्यांच्याशी उद्धव यांना चर्चा करावी लागणार आहे. त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भाही चर्चा होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तर मी बोलायला तयारमध्यंतरी उद्धव हे विधानभवनात आले होते. तेव्हा त्यांनी काही पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली होती. दोन भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. या आधीदेखील त्यांनी दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना नेहमीच पूर्णविराम दिला आहे. तसेच, पत्रकारांपैकीच कोणी पुढाकार घेणार असेल तर आपण या ध्वनिफिती मागण्यासाठी राजशी लगेच बोलायला तयार आहोत, असेही म्हटले होते. मात्र, राज यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा आपण करणार नाही हेही स्पष्ट केले होते.