मुंबई - ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्यात आली असून लाभार्थ्याचा फोटो जुळला, तरच ग्राहकाला दहा रुपयात शिवथाळी मिळणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र शिवभोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची सक्ती नसल्याचा खुलासा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ येत्या २६ जानेवारी रोजी होईल, अशी माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी दिली होती. शिवभोजन योजनेत थाळ्यांसह त्यातील जेवणाच्या प्रमाणावर बंधन घालण्यात आले असल्याचे ते म्हणाले होते. तर शिवभोजनासाठी आधार कार्ड दाखवावं लागणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर मोठ्याप्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाले होते.
त्यामुळे सरकारने आता एक पाऊल मागे घेतले असून शिवभोजनासाठी आधार कार्डची सक्ती नसणार असल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क कार्यालयाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. तर जिल्हा रुग्णालये,बस-स्थानक,रेल्वे परिसर,बाजारपेठ,शासकीय कार्यालय परिसरात ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 ठिकाणी ही योजना सुरु केली जाणार असल्याची महिती सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.