राजेश सोळंकी -देउरवाडा/आर्वी : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री करून घ्यावी, असे शिक्षण संचालकांचे निर्देश आहेत. आधार नोंदणीकरिता ३१ जानेवारी ही अंतिम मुदत असून आतापर्यंत राज्यातील केवळ ६९.९४ टक्केच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत २ कोटी २३ लाख ६ हजार ३९ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ कोटी ५६ लाख ८२ हजार २१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी व अद्ययावतीकरण केले आहे. अद्याप ६७ लाख २१ हजार ८२४ विद्यार्थी आधार नोंदणीपासून दूरच आहेत. महाराष्ट्रात आधार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा अव्वल असून, ९५.०२ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी असून ९१.४ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ८९.८६ टक्के विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी केली असून, राज्यात जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे.
ठाणे आणि औरंगाबाद जिल्ह्याची नोंदणी मात्र ५० टक्क्यांच्या आतच आहे. अद्ययावतीकरण करताना येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणींसंदर्भात आधार जिल्हा समन्वयक अधिकारी यांची १८ जानेवारीला ऑनलाइन बैठक झाली. आधार नोंदणीसाठी ८१६ आधार संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्याला दोन ऑपरेटर देण्यात आले असून, या महिन्यात ही नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.