आढळरावांनी सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा; डॉ. कोल्हेंची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 11:04 AM2019-09-11T11:04:19+5:302019-09-11T11:10:36+5:30
भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील टीका टीप्पणी थांबेल असा अंदाज होता. परंतु, ही टीका टीप्पणी थांबण्याऐवजी आणखीनच वाढत आहे. आढळराव यांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ. कोल्हे यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
भोसरी येथे बोलताना आढळराव यांनी मतदार संघातील तीन महिन्यांच्या कामगिरीनंतर डॉ. कोल्हे यांच्यावर कडाडून टीका केली. जातीचं राजकारण करून विजय मिळविणाऱ्या डॉ. कोल्हेंना निवडून दिल्याचा जनतेला पश्चाताप होत असल्याचे आढळराव म्हणाले होते. तसेच शिवस्वराज्य यात्रेनंतर राष्ट्रवादी पक्ष संपुष्टात येईल, अशी टीका आढळरावांनी केली होती. याला डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर येथे पोहोचलेल्या शिवस्वराज्य यात्रेतून प्रत्युत्तर दिले.
डॉ. कोल्हे म्हणाले, की पराभवाच्या नैराश्यातून आढळराव बोलत आहेत. परंतु, त्यांनी जनतेकडून मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा. आढळरावांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्लाच कोल्हे यांनी दिला. आता कोल्हे यांच्या टीकेला आढळराव पुन्हा काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान आढळराव पाटील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणखीच सक्रीय झाले आहे. त्यांनी शिवसेनेची बाजू लावून धरत भोसरी मतदार संघावर शिवसेनाचा दावा सांगितला आहे. आता विधान सभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे.