मुंबई, दि. 12- देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन बनावट नोटा सापडल्याच होत्या. आता बनावट आधार कार्डांचा पर्दाफाश झाला, असं सांगतानाच एकीकडे आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय?, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे . 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
एकीकडे आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्डसारखा करता येईल असं सरकारकडून सांगितलं जात आहे. आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा आधार कार्डसुद्धा बनावट ठरणार असेल तर कसं व्हायचं?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सामनातून टीका केली आहे.
सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की,- आधार कार्डवरून वादाचा धुरळा उडाला नाही असे होत नाही. आधार कार्डच्या सुरक्षिततेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आधार कार्डद्वारा व्यक्तिगत माहिती ‘लीक’ झाल्याचेही आरोप झाले. आता त्यात बनावट आधार कार्डांची भर पडली आहे. देशभरात सुमारे तीन लाख बोगस आधार कार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे ज्या कंपनीकडे आधार कार्ड नोंदणीचे काम दिले होते त्याच कंपनीचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. मध्य प्रदेशातील या रॅकेटमुळे आधार कार्डची सुरक्षितता, त्याचे पिटले जाणारे ढोल, सरकारी, बिगरसरकारी कामांमध्ये त्याची केली जात असलेली अनिवार्यता या सर्वांवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. आधार कार्डच्या सुरक्षेविषयी सरकारतर्फे केला जाणारा दावाही पुन्हा एकदा पोकळ ठरला आहे. आपल्या देशात भ्रष्टाचारी यंत्रणा किती खोलवर रुजली आहे याचाही हा ‘आदर्श’ नमुना आहे.
बनावट आधार कार्डांचे रॅकेट उघड झाल्याने प्रशासनाने नवे सॉफ्टवेअर तयार केले. मात्र मध्य प्रदेशातील या कंपनीने हे नवे सॉफ्टवेअरच हॅक करणारे ऑप्लिकेशन तयार केले आणि ते बनावट आधार कार्ड बनविणाऱ्यांना विकले. तपास यंत्रणांपेक्षा चोर दोन पावले पुढे असतात असे जे म्हटले जाते त्याचाच हा मासलेवाईक दाखला म्हणायला हवा. याप्रकरणी १० जणांना अटक झाली असली तरी बनावट आधार कार्डांची वाळवी आतापासूनच लागली तर व्यक्तिगत आणि देशाची सुरक्षा पोखरून काढायला तिला वेळ लागणार नाही.
पूर्वी अनेक गैरप्रकार बोगस रेशन कार्डद्वारा केले जात. बोगस आणि घुसखोरांना मतदान ओळखपत्रे बनविण्यासाठीही बोगस रेशन कार्डचा सर्रास वापर होत आला आहे. बोगस रेशन कार्डांची जागा बनावट आधार कार्डांनी घेतली असे आता म्हणायचे का? देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन बनावट नोटा सापडल्याच होत्या. आता बनावट आधार कार्डांचा पर्दाफाश झाला. एकीकडे आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्डसारखा करता येईल असे सांगितले जात आहे. आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा ‘आधार’ही बनावट ठरणार असेल तर कसे व्हायचे? सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय?