Aaditya Thackeray News: २०२४ हे आपले वर्ष आहे. आपल्याला पुन्हा आपली सत्ता आणायची आहे . देशातील हे वातावरण भानायक होत चालले आहे . महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ज्या मंत्र्यांनी महिलांना टीव्हीवर शिव्या दिल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? वाद निर्माण करून ते जिंकतात. राज्यातील चित्र बदलायचे असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. 'प्राण जाय पर वचन ना जाये' हे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे आपल्याला गद्दारांना गाडून आपले सरकार आणावचे लागेल, असा निर्धार ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
एरंडोल येथील "महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र" मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अपेक्षित असा निकाल आहे. आमच्याबद्दल जो घोळ झाला तोच या ठिकाणी पण केला गेला आहे. अध्यक्ष हे काम करताना पक्षपात करत आहेत, हे धक्कादायक आहे . संविधानाचा अपमान त्यांनी केला आहे . पण पक्ष फोडूनही तुमचे ४०० पार होणार नाही . शरद पवार जिद्दीने लढत आहेत. शून्यातून त्यांनी निर्माण केले आहे. आता यांना महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही
दिल्लीत कोणाला एवढे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? अन्न दात्याला! जणू काही ते दहशतवादी आहेत. एका सभेत ड्रोनमधून अश्रू धूर सोडले. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. राम मंदिर झाले. पहिले मंदिर फिर सरकार म्हटल होते. मंदिर झाल्यावर रामराज्य यायला पाहिजे होते. पण असे शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . सत्ताधाऱ्यांनी आपला महाराष्ट्र अस्थिर ठेवला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात नवे उद्योग येणार कसे? घरे पेटवून प्रगती होत नसते. भांडण लावून विकास होत नाही आणि समाजाला विखरून देश पुढे जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी तरुणांच्या मनातला आश्वासक महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र हाच धर्म मानून आपण एकत्र यायला हवे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.