मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप-शिवसेनेने पुन्हा फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र अहिर यांचा प्रवेश म्हणजे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभेत वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. तर सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर या मतदारसंघात आता राष्ट्रवादीकडे सक्षम असा उमेदवार राहिला नाही. त्यामुळे अहिरांचा प्रवेश आणि आदित्य ठाकरेंच निवडणूक लढवण्याचे ठरलं, अशी चर्चा सुरु आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य यांनी वरळी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघातील युवासेनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावून मतदारसंघातील माहिती घेतली होती. त्यानंतर आदित्य हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असल्याचे सुद्धा बोलले जात होते.
मात्र, वरळी हा सचिन अहिर यांचा मतदारसंघ असून, तिथे अहिर यांची पकड मजबूत आहे. हे पाहता आदित्य यांना वरळीमधून सहज विजय मिळवणे कठीण होते. त्यामुळे थेट सचिन अहिर यांनाच सेनेत घेऊन शिवसनेने राजकीय खेळी खेळली आहे. तर आदित्य यांचा वरळीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना सत्तेत आल्यास आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.