मुंबई-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांशी वैयक्तिक पातळीवर जाऊन संपर्क साधत पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी 'निष्ठा यात्रे'ची घोषणा केली आहे. शिवसेनेतील ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. अशा आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. यासाठीच्या दौऱ्याला आजपासूनच आदित्य ठाकरेंनी सुरुवात केली आहे.
बंडखोरांना मात देण्यासाठी शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला असून यासाठी आदित्य ठाकरे मुंबईतील तब्बल २३६ शाखांमध्ये आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.
एकनाथ शिंदेंसारख्या बड्या नेत्यानं बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरे मुंबईत एकादिवसाआड शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. तर आदित्य ठाकरे मैदानात उतरुन महाराष्ट्राचा दौरा करुन लागले आहेत. दुसरीकडे खासदार संजय राऊत देखील कामाला लागले आहेत. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ माजी नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे, तर नागपुरातील शिवसेना नगरसेवकांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेचे खासदारही शिंदे गटाच्या संपर्कातशिवसेनेच्या ४० आमदारांनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला मोठे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.