मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा अधिकांश फटका कोकणातील महाड आणि चिपळूणला बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानीही झाली. यानंतर पावसाने उसंत घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा केला. याच बरोबर आज केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आज कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. (Aaditya Thackeray on Opposition’s allegations that CM didn’t step out during floods)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना, "मातोश्रीचा दरवाजा बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) अॅडमिट होते. आज सकाळी डिस्चार्ज केला. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? थोडी तरी आहे का? हे झाल्या झाल्या पाहायला यायला पाहिजे होतं, अशी टीका राणेंनी केली होती. यावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता थेट उत्तर दिले आहे.
"जर आपण विरोधकांवर लक्ष केंद्रीत करत राहिलो, तर काहीच करू शकणार नाही. आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. यावेळी लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.”, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे -"काल साडे सहाला माझा फॅक्स आला. की आम्ही चिपळूण आणि रायगडची पाहणी करण्यासाठी येत आहोत. त्यानंतर त्यांनी (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) हा कार्यक्रम आखला. मातोश्रीचा दरवाजा तेव्हा उघडला. बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी डिस्चार्ज केला. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? थोडी तरी आहे का? हे झाल्या झाल्या पाहायला यायला पाहिजे होतं. हेलिकॉप्टर मिळत नाही? उभं राहून बंदोबस्त करायला हवा होता. या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला हवं होतं. सर्व व्यवस्था करायला हवी होती. जी आता भाजपकडून सुरू आहे. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री? या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे," अशी घणाघाती टीका राणे यांनी यावेळी केली होती.
राज्यावरील संकटं मुख्यमंत्र्यांचा पायगूण; पाय बघायला पाहिजे...; नारायण राणेंचा हल्लाबोल
आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळस त्यांच्यासोबत आमदार भास्करराव जाधव, मंत्री अनिल परब आणि अन्य नेते उपस्थित होते.
लवकरच मदत मिळणारमुख्यमंत्री पुढे म्हणाले, माझ्याकडे दोन-चार दिवसात अहवाल येणार आहे. राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत. अहवाल आल्यावर सर्वकष मदत केली जाईल. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, असे ते म्हणाले.