Aaditya Thackeray: लोकसभा निवडणुकांच्या आधी देशातील काही राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीने रणनीति आखायला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. यातच पुढील मध्य प्रदेशात निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार का, याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले.
मीडियाशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. त्यासाठी कमलनाथ यांनी बोलावले आहे. या सोहळ्याला मध्य प्रदेशात आलो आहे. कमलनाथ आणि आमचे नाते जुने आहे. आमचे सरकार असताना किंवा इंडिया आघाडी आकार घेत असताना कमलनाथ यांच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा झाल्या आहेत. त्यांनी अनेकदा चांगले सल्ले दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ यांच्याशी वेगळे नाते आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
मध्य प्रदेशात शिवसेना ठाकरे गट निवडणुका लढवणार का?
मध्य प्रदेशात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे तिथे प्रचार करण्यासाठी तुम्ही जाणार का आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढवणार का, असे प्रश्न आदित्य ठाकरेंना करण्यात आला. यावर, मध्य प्रदेशात निवडणुका लढवण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. इंडिया आघाडीत प्रचारासाठी काय रणनीति ठरते, त्यानुसार मध्य प्रदेशात प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारताची लोकशाही सर्वांत मोठी मानली जाते. मात्र, देशात लोकशाही उरली आहे का, असा सवाल करत महाराष्ट्रात दीड वर्ष घटनाबाह्य सरकार आहे. पैशांची उधळपट्टी सुरू आहे. केवळ होर्डिंगवर घोषणा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात काही घडताना दिसत नाही. लोकांना मदत मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल वाढत चालले आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांना मंत्रिमंडळातून शिवीगाळ केली जाते, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.