आज मराठी भाषा गौरव दिन आहे. याच निमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ठाकरे यांनी "रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी, चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी. मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी तसेच मराठीचा ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया!" असं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "'गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता' असा हट्ट असलेल्या राज्यातील भाजप नेत्यांचीही याबाबत वरिष्ठांशी बोलण्याची हिंमत नाही. पण म्हणून महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही!" असं म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा य़ासाठी आमच्या मविआ सरकारच्या काळात आम्ही प्रचंड प्रयत्न केले होते. आमचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री सुभाष देसाई जी यांनी केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा केला होता, पुरावे सादर केले होते. परंतु महाराष्ट्राकडे केवळ ओरबाडून घेण्याच्या नजरेतून बघणाऱ्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राच्या मातीचा, परंपरेचा, भाषेचा आदर करावा असं कधीच वाटलं नाही. त्यांचा दिखाऊपणा केवळ मतांसाठीच! पण त्यामुळे अजूनही आपली मराठी भाषा 'अभिजात' दर्जापासून वंचित आहे."
"'गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता' असा हट्ट असलेल्या राज्यातील भाजप नेत्यांचीही ह्याबाबत वरिष्ठांशी बोलण्याची हिंमत नाही. पण म्हणून महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही! मराठीला 'अभिजात' दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न अधिक तीव्र करणार आणि आमचं सरकार येताच मराठीला 'अभिजात' दर्जा मिळवून देणारच!" असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.