पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. संपूर्ण देश या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा साक्षीदार झाला. यावेळी, अयोध्येतील सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी राम मंदिरातील सोहळ्याबाबत एक ट्विट केलं आहे.
"बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं" असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रघुपती राघव राजा राम, पतित पावन सिता राम! हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं! प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो! जय सिया राम!" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. पाच मंडपातून पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या गाभाऱ्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेची सुरुवात करण्यात केली. प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प करण्यात आला. गणपती पूजन करून रामललाचे पूजन, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चांदीचा एक मुकूट श्रीरामचरणी अर्पण केला.
प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली. राजस सुकुमार असेच रामललाचे स्वरुप भावले. रामललांना विविध प्रकारची फुले, हार, रत्नजडीत अलंकार अर्पण करण्यात आले. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते.