लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार आणि मुंबई महापालिकेने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालवली आहे. यापूर्वी पेंग्विन, आरेतील प्राणिसंग्रहालय, पवईतील सायकल ट्रॅकनंतर आता मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची भर पडली आहे. या अनावश्यक प्रकल्पावर होणारा कोट्यवधींचा खर्च हा एक प्रकारचा घोटाळाच असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुंबईतील प्रकल्पांवरून शिवसेनेवर टीका केली. कमी पाऊस आणि वाळवंटी प्रदेशात निक्षारीकरणाचे अर्थात समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प केले जातात; पण मुंबईत मोठा पाऊस पडतो. तलाव, नद्यांसह ६०० किलोमीटर लांबीचे नाले मुंबईत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी खर्चिक आणि त्रासदायक ठरणार आहे. तब्बल ३ हजार ५२० कोटींचा हा प्रकल्प एक प्रकारचा गैरव्यवहार असल्याचा आरोप आपने केला आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पाचे कोणतेच नियोजन, तपशीलवार माहिती, तसेच प्रकल्पाच्या आवश्यकतेची स्वीकृती नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याचा आरोपही आपने केले, तसेच हा काल्पनिक प्रकल्प तात्काळ थांबवावा आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.