यदु जोशी, मुंबईअसहिष्णुतेच्या वक्तव्यावरून संघ परिवाराच्या टिकेचे लक्ष्य बनलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर होणार आहे. मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला झाल्यानंतर त्याच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि गणमान्य व्यक्तींच्या सन्मानार्थ स्रेहभोजन दिले होते. त्यावेळी आमिर खानने पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करून आमिरविषयीची कटूता संपविली. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांना राज्यासाठी काही योगदान देण्याची विनंती केली होती. ती लगेच मान्य करत आमिरने जलयुक्त शिवारचा ब्रँड अॅम्बेसिडर होण्यास होकार दिला.जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून आमिर आता कामे सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देणार आहेत. तेथील शेतकऱ्यांशी ते चर्चा करतील आणि या योजनेचा प्रचारही करतील. या शिवाय ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविली गेली अशा ठिकाणच्या यशोगाथा टीव्ही चॅनेल्सवर आणतील. महानायक अमिताभ बच्चन हे राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेतच. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी उद्योग विभागाने तयार केलेल्या चित्रफितीमध्ये अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी योगदान दिले आहे.देशात सध्या अहिष्णुतेचे वातावरण असून मुलांच्या काळजीपोटी आपण देश सोडून परदेशी जाऊ का अशी विचारणा पत्नीने केली होती, असे वक्तव्य आमिरने केले होते. त्यावरून देशभर बराच गदारोळ माजला होता. विशेषत: भाजप समर्थकांनी आमिरला टिकेचे लक्ष्य बनविले होते.
आमिर ‘जलयुक्त’चा ब्रँड अॅम्बेसिडर!
By admin | Published: February 17, 2016 3:29 AM