ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मरनार्थ दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमिर खान याने तब्बल 16 वर्षानंतर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात आमिर खानला पुरस्कार स्वीकारताना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
आमिर खानच्या लगान चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यावेळी तो ऑस्करच्या सोहळ्यासाठी गेला होता. परंतु त्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही. तेव्हापासून आतापर्यंत आमिर खानने एकाही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. मात्र, सोमवारी (दि.24) मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमिर खानला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमिर खानला दंगल या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला.
आमिर खान सोबतच प्रदीर्घ हिंदी चित्रपट सेवेबद्दल अभिनेत्री वैजयंती माला, प्रदीर्घ नाट्य सेवेबद्दल अभिनेत्री आशालता, प्रदीर्घ क्रीडा सेवेबद्दल माजी क्रिकेटपटू कपिल देव, पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. उदय निरगुडकर, अमर फोटो स्टुडिओ नाटकाचे निर्माते सुनील बर्वे आणि प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल गायिका कौशकी चक्रवर्ती यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.