- विकास शहा
शिराळा तालुक्यातील करमाळे या गावी 'पाणी फाऊंडेशन'चे संस्थापक, अभिनेते आमीर खान लवकरच भेट देणार आहेत. स्वतः आमिर खान (Aamir Khan) यांनी याबाबतची माहिती समाज माध्यमातून एका एका ध्वनीचित्रफीतीद्वारे दिली आहे. करमाळे येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली होती.
करमाळे हे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील आहे. भरपूर पाऊस पडत असुनही गेल्या अनेक वर्षांपासून इथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुसंख्य लोक मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक योजनेची वाट बघत एक पिढी म्हातारी झाली आहे. गावातील तरूणांनी गाव पाणीदार होण्यासाठी लोकसहभागातून, श्रमदानाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीळगंगा नदीच्या पुर्नजीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तीळगंगा नदीचा उगम करमाळ्याच्या महादेव डोंगररांगेत होतो. पुढे सुरूल - ओझर्डे - पेठ मार्गे ही नदी बहे ता.वाळवा येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते.
आता स्वत: आमिर खान यांनी करमाळे गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे पुन्हा एकदा तीळगंगा नदीच्या पुर्नजीवन चळवळीला उर्जित अवस्था आली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे करमाळे गावचे राकेश माने यांनी आमिर खान यांची भेट घेऊन त्यांना गावाला भेट देण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार आमिर खान करमाळे येथे येणार आहेत. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नेमकी वेळ समजू शकलेली नाही.पण तूमच्या गावाला मी नक्की भेट देणार आहे, असे आमिर खान यांनी एका ध्वनीचित्रफीतीद्वारे सांगितले आहे. गावात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम सुरू झाल्यास तीळगंगा नदीचे पुनर्जीवन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांच्या येण्याने गावकऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.