अमरावती : राज्यात पाण्याची समस्या भीषण आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करणे शक्य आहे. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी ग्वाही पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर खान यांनी दिली.वरुड तालुक्यातील वाठोडा गावात गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आमीर खान आले. या वेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अभिनेत्री रिमा लागू व सई ताम्हणकर, अभिनेता सुनील बर्वे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. आमीर यांनी गावच्या पाझर तलावात श्रमदान करून तलावातील गाळ काढला. वाठोडा गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मानवी साखळी करून दोन तास श्रमदान केले. आमीर म्हणाले, ‘आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्यात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा आयोजित केली आहे. राज्य पूर्णपणे टंचाईमुक्त होईपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेत राहू. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावात जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार असल्याने प्रत्येकच गाव विजेता ठरेल,’ असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पाणीसंकट दूर होईपर्यंत कार्यरत राहणार - आमीर खान
By admin | Published: May 06, 2016 2:08 AM