ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - अभिनेता आमिर खान... तो आला... त्याने पाहिलं... हाती फावडं घेतलं... सोबत टोपलं घेतलं... आणि जमिनीत फावडा मारुन माती उकरली... स्वत:च्या हाताने टोपलीत भरली... उचलली आणि दूर नेऊन टाकली सुद्धा... लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी श्रमदानाला आमिर खान आल्यावर घडलेली ही गोष्ट. मांजरा नदीच्या पट्ट्यातील ओसाड माळरानावर आमिर खानने पत्नी किरणसह केलेल्या श्रमदानाची चर्चा आता लातूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.
हे चित्रपटाचे शुटींग नसून पाण्याच्या संघर्षाची खरीखुरी कहाणी आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या सकस अभियनाने सर्वांच्या मनावर मोहिनी घातलेल्या आमिर खानने मंगळवारी चक्क लातूर जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नदीच्या पट्ट्यात फावडा आणि टिकाव चालवला. एका गावात २० मिनिटे तर दुस-या गावात चार तास खर्च केलेल्या या अभिनेत्याने नुस्ते श्रमदानच केले नाही तर पाण्याची समस्या गावक-यांना कशी आहे ? याची माहिती घेतली. उपाय काय केला पाहिजे ? याचा कानोसा घेतला.
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा ही ती दोन गावे. आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत ही दोन गावे सहभागी झाली आहेत. या दोन्ही गावचे गावकरी मोठ्या प्रमाणात श्रमदान करुन पाणी मोहिम राबवित आहेत. त्यांच्या या चळवळीला आज आमिर खानने स्वत: उपस्थित राहून आपल्या पाणी फाऊंडेशनचे बळ दिले. एवढा मोठा अभिनेता आपल्या गावात आपल्या पाण्यासाठी खोरे - टोपले घेऊन काम करतोय, याने गावक-यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.
आमीर येण्याची बातमी ठेवली गुप्त !
सुरक्षेच्या कारणावरुन पोलिसांनी व्हीव्हीआयएमपी माणूस येणार एवढेच कळविले होते. त्यामुळे ‘आमीर येणार’ ही बातमी गुप्त राहिली. मात्र तरीही पोलिसांचा भलामोठा फौजफाटा पाहिल्यावर कुणीतरी मोठा माणूस येणार म्हणून गर्दी जमली ती जमलीच.
तगरखेड्यात अर्धात तास बांध खंदून आमिरने केले पाणी श्रमदान !
तगरखेडा शिवारातील प्रत्येकाच्या शेतात संध्या बांध बखिस्तीचे काम चालू आहे. आमीर खानने डॉ. शरद मठपती यांच्या शेतात बांध बंधिस्ती करुन श्रमदान केले.
आनंदवाडीत एका घरात घेतली गावक-यांची बैठक
आनंदवाडी गौर या गावात आमिर खानने गावातील पाणी चळवळीतील १५ पुरुष आणि १५ महिलांची एका घरात बैठक घेतली. त्यांच्याकडून पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना आपल्याकडी सूचना केल्या. तुम्ही श्रमदान करा, तुमच्या गावाला आमिर खान पाण्यासाठी लागेल तेवढे पैसे देईल, अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.