ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 17 - अभिनेता आमीर खानला जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनवण्याच्या वृत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला झाल्यानंतर, त्याच रात्री पंतप्रधानांशी चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी आमीर खानला जलयुक्त शिवारचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनण्याची विनंती केली होती अशा बातम्या येत होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी या बातमीला नकार देत चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
असहिष्णतेच्या मुद्यावरुन आमीर खानने केलेल्या वक्तव्यामुळे आमीर खानवर टीका झाली होती. या वक्तव्यानंतर अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुनही त्याला काढून टाकण्यात आलं होतं.