मुंबई - दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस आणि आप हे दोन पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते, तर ही दंगल थांबवू शकले असते, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात केला. दिल्ली हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने या हिंसाचारास मोदी सरकारला जबाबदार धरलं असून गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला आहे.
केंद्रीयमंत्री आणि भाजपाच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र दिल्लीतील दंगलीला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलंय. दिल्ली दंगल आधी आपच्या नगरसेवकाने भडकवली. त्यानंतर काँग्रेसने ती आणखी भडकवली, असेही आठवलेंनी म्हटले. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती झाल्यानंतर आठवलेंनी खासदार संजय राऊत यांनाही चिमटा काढला. ज्या संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यांच्यावरच पक्षाने अन्याय केला. किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे म्हणत आठवलेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला.राज ठाकरे यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असा दावाही आठवले यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान, दिल्लीतील दंगलींना आळा घालण्यात घोर अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर काँग्रेस ठाम असून, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पक्ष हा विषय संसदेत नेटाने लावून धरील, असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी सांगितले.