भोर : महाड-पंढरपूर रस्त्यावरील आपटी (ता. भोर) गावाजवळच्या वळणावरच्या पुलाचे काम मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. पुलाचा भराव करण्यासाठी टाकलेली माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून नदीत जाणार आहे. यामुळे नदीतील व पर्यायाने नदीच्या पात्रात असणाऱ्या विहिरीचे पाणी खराब होणार आहे. यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. टाकलेली माती काढावी अशी मागणी करीत आहेत. मात्र याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे.भोर-महाड रस्त्यावरील साळेकरवस्ती ते नांदगावच्या हद्दीपर्यंत व भोरकडून जाणाऱ्या रस्त्यावरील आपटी गावाच्या वळणापासून ते गावाजवळच्या पुलापर्यंतचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र यातील साळेकरवस्तीपासूनचा रस्ता सहा महिन्यांनी अडखळत पूर्ण झाला आहे. मात्र एका मोरीचे काम उशिराने झाल्याने थोडा रस्ता अपूर्ण आहे. आपटी गावाजवळचा रस्ता उकरून ठेवला आहे. रस्त्याचे इतर काम व पूलही अपूर्ण आहे. पुलाचा भराव करण्यासाठी टाकलेली माती पावसाने वाहून नदीपात्रात जाणार असून, नदीपात्रातील विहिरीचे पाणी खराब होणार आहे. त्यामुळे आपटी येथील ग्रामस्थांनी ही माती त्वरित बाजूला काढण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)>पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस नीरा देवघर धरण, वरंध घाट, धबधबे, निर्सगरम्य वातावरण आणि कोकणात जाणारा मार्ग यामुळे पर्यटक नेहमीच गर्दी करतात. मात्र महाड-पंढरपूर रस्ता अत्यंत खराब व अरुंद तर साईडपट्ट्या खोलवर गेलेल्या आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्यात गाडी खाली घेण्यावरून वादावादी होते. आपटी येथील रस्त्याचे व पुलाचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे. पुलाचा भराव करण्यासाठी टाकलेली माती नदीपात्रातील विहिरीत जाऊन पाणी खराब होणार आहे. त्यामुळे ही माती बाहेर काढावी.- रघुनाथ पारठे, सरपंच, आपटी
आपटी पुलाचे व रस्त्याचे काम अपूर्ण
By admin | Published: June 27, 2016 1:20 AM