जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:15 PM2024-01-03T22:15:34+5:302024-01-03T22:16:06+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
ठाणे : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाल्याचा पहायला मिळाला. या वक्तव्याविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरासमोर जय श्रीरामच्या घोषणा देत आरती करण्याचा प्रयत्न केला.
जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पहिल्यांदाच मनातले सर्वकाही बोलले
दरम्यान, या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आव्हाड म्हणाले की, "माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला."
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024
"पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत, म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत," अशी टीका आव्हाडांनी अजित पवारांवर केली.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ''आपण हा इतिहास तुम्ही वाचत नाही. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आहे, बहुजनांचा. तुम्ही तिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात. पण, त्या रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. 14 वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो'', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे.