लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत.आष्टी परिसरातील हा एकमेव पूल असल्याने या परिसरातील अनेक नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, चंद्रपूरकडे जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या अनेक ट्रक आष्टी मार्गेच बल्लारशाला जातात. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. आष्टी पुलाची उंची अतिशय कमी आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने अनेकवेळा या पुलावरून पाणी वाहत होते. पाणी वाहल्यामुळे येथील डांबर निघून जाऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत दुरूस्ती करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन सदर मार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. या धुळीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डोळ्यात धूळ गेल्याने वाहनचालकाचा तोल जाऊन वाहनासह चालक नदीच्या पात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आष्टी पुलावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM
खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : धुळीचा त्रास वाढला