ऑनलाइन लोकमत
अंजनी, दि. १७ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंजनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा व दोन्ही कन्यांनी आबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, गोरगरिबांबद्दल विलक्षण कळवळा आणि धडाकेबाज निर्णय याआधारे महाराष्ट्राच्या राजकारणात छबी उमटविणारे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी कर्करोगामुळे निधन झाले होते. मंगळवारी त्यांचे पार्थिव अंजनी या त्यांच्या मुळगावी नेण्यात आले. तासगाव ते अंजनी या अंत्ययात्रेत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देतांना अनेकांना अश्रू आवरता आले नाही. अंजनीतील हेलिपॅड मैदानावर आबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नारायण राणे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही याप्रसंगी उपस्थित होते. पाटील यांना निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्या होत्या. उपस्थित जनसमुदायाने आर. आर. पाटील अमर रहे अशी घोषणा देत मैदान दणाणून सोडला.