अतुल कुलकर्णी , मुंबई नियम आणि निकष डावलून सार्वजनिक आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषधांची मनमानीपणे खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी महागडी औषधे वापराविना वाया गेली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक नसतानाही औषधांची खरेदी केली जात असल्याने ही औषधे शिल्लक राहिली आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी ऐन्टीडी नावाच्या इंजेक्शनच्या ४८०० व्हॉयल मागवल्या. प्रत्यक्षात ३१०६ इंजेक्शन मुदत संपलेले (एक्सपायरी डेट उलटलेले) असल्याने ते सर्व वाया गेले. एका इंजेक्शनची किंमत सुमारे २ हजार रुपये आहे. हाच प्रकार यवतमाळ (११७३), वर्धा (३८२) येथे घडला व हजारो इंजेक्शन्स वाया गेली. आता या प्रकारावर पांघरूण घालण्याची धडपड सुरू झाली आहे. ‘स्ट्रेप्टोकायानेझ १५ लाख’ या एका इंजेक्शनची किंमत जवळपास १ हजार रुपये आहे. या इंजेक्शनचा साठाही अनेक जिल्ह्यांत असाच विनावापर पडून राहिला आणि वाया गेला. उस्मानाबाद जिल्ह्यात असे ८६ इंजेक्शन्स वाया गेले. हाच प्रकार सर्जिकल साहित्याच्या डिस्पोजेल सिरिंज, निडल्सच्या बाबतीतही झाला. भंडारा, पवनी, लाखनांदूर, मोहाडी, लाखनी, तुमसर, साकोळी, शिओरा आदी ठिकाणी मिळून असे १,६७,३४९ इंजेक्शन्स वाया गेल्याचे त्या त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी कळवले आहे.या सगळ्यात धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात घडला. तेथील शल्य चिकित्सकाकडून पॅरॉसिटेमॉल सिरपच्या १० हजार ८७० बाटल्या अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही माहिती एफडीएकडे देणे आवश्यक असताना वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने परस्परच ही माहिती मॅकब्रो हेल्थ केअर प्रा. लि. या मध्य प्रदेशातील कंपनीला कळवली आणि त्यांच्याकडून १० हजार ८७० बाटल्या बदलूनही घेतल्या. मात्र ‘आपण आपला जुना साठा परत नेला नाही आणि जर का अन्न व औषध प्रशासनाने या रुग्णालयास भेट दिली तर हा साठा जप्त होऊ शकतो, त्यामुळे आपण आपला साठा तातडीने घेऊन जा’ असे कळवून टाकले आहे.वास्तविक, असा अप्रमाणित औषधांचा साठा सापडला तर त्याची माहिती एफडीएला दिली पाहिजे, त्यांनी तो साठा जप्त केला पाहिजे. मात्र, या प्रकरणात तुम्ही तुमचा साठा घेऊन जा, कुठेही विका आणि त्यातून कोणाला काही झाले तर तेही तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी भूमिका घेणे हे किती जीवघेणे ठरू शकते, हे कळत असतानाही असा पत्रव्यवहार झाला असल्याचे समजते.
आरोग्य विभागात बेबंद खरेदी; कोट्यवधींची औषधे वाया
By admin | Published: April 06, 2016 5:24 AM