- नरेश रहिलेगोंदिया _ लहानपणात कुणी माती खातो, कुणी चूना, खडू, राखड खातात परंतु गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीने चक्क केस खाल्ले. ते केस एक, दोन किंवा पाच नाही तर तब्बल ५०० ग्रॅम केस खाल्ले. यामुळे तिच्या पोटता अन्न जाईना. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावर तिच्या पोटात चक्क केसांचा गोळा जमा झाला हाेता. गोंदियाच्या द्वारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या दहा वर्षाच्या मुलीच्या पोटातून तो अर्धा किलो केसांचा गुच्छा शस्त्रक्रीया करून काढण्यात आला.
तिरोडा तालुक्याच्या करटी येथील एका दहा वर्षाच्या मुलीला मागील तीन वर्षापासून भूक न लागणे, पोट दुखणे, उलटी होणे हा त्रास होत होता. त्याकरिता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हितेश मंत्री यांना दाखविले. त्यांनी त्या मुलीची सोनोग्राफी काढली असता पोटात काहीतरी वेगळी वस्तू असल्याचे कळले. त्यांनी तिला पुढील उपचाराकरिता गोंदिया येथे रेफर केले. द्वारका ल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. विभू शर्मा यांच्याकडे पाठविले. डॉ. शर्मा यांनी तिची तपासणी केली व सविस्तर विचारपूस केली असता ती लहानपणी केस खायची असे तिच्या वडिलांनी सांगितले. परंतु आता तिने केस खाणे बंद केले आहे, असेही सांगितले.
डॉ. शर्मा यांनी तिच्या पोटाचे सिटीस्कॅन काढले असता पोटात केसांचा गुच्छ असून तो आतड्यात गुंतलेला असल्याचे लक्षात आले. त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. शस्त्रक्रीया करतांना मुलीच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांच्या संमतीने ही शस्त्रक्रिया डॉ. अविनाश येळणे, डॉ, यामीनी येळणे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विभू शर्मा यांनी डॉ. श्रद्धा शर्मा यांच्या मदतीने बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. नरेश येरणे यांच्या सोबत २४ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून अर्धा किलो केसांचा गुच्छा त्या मुलीच्या पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी आहे. तिला लवकरच रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी राहुल कावरे व नेहा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.
केस खाणे हा एक मानसिक आजार असून त्याला याचे प्रमाण फार कमी आहे. हा आजार क्वचितच आढळताे. त्या मुलीची यशस्वी शस्त्रक्रीया झाली असून या शस्त्रक्रियेला तीन तासाचा वेळ लागला आहे.-डॉ. विभू शर्मा, बाल शल्यचिकित्सक गोंदिया.