नवा वाद : जाहीर सभेत जीभ घसरली
सांगली : निवडणूक अंतिम टप्प्यात असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील शनिवारी चांगलेच अडचणीत आले. बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनसेच्या उमेदवाराला आमदार व्हायचे होते, तर किमान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा, असे वक्तव्य पाटील यांनी जाहीर सभेत केल्याची चित्रफीत खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दाखवली. माजी गृहमंत्र्यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांच्या सोज्वळतेचा बुरखा फाटला आहे, अशी टीकाही खा. पाटील यांनी केली.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शुक्रवारी रात्री प्रचार सभत बोलताना आर. आर. पाटील म्हणतात की, ‘आज मनसेचे कार्यकर्ते मला भेटण्यास आले आणि म्हणाले की आमचा पाठिंबा तुम्हाला. मी का म्हणून विचारले, तर ते म्हणाले, आमचा उमेदवार तुरुंगात आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. आता तो राहायला मिरजेत. त्याला आपल्या तालुक्याचा आमदार व्हायचे आहे, तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा!’ या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी सांगितले.
उपरोधिक टीका
प्रचारसभेत आपण मनसेच्या उमेदवाराबाबत केलेली टीका उपरोधिक होती. या उमेदवारावर आतार्पयत बेकायदा शस्त्र बाळगणो, विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. आता हा दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. यातून कोणी वेगळे अर्थ काढत असेल, तर मी खेद व्यक्त करतो.
-आर. आर. पाटील, माजी गृहमंत्री
आर. आर. पाटील यांचे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे आहे. तासगाव तालुक्यात महिलांवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यात काही प्रकरणो पोलीस ठाण्यार्पयत जाऊ शकली नाहीत, तर काही प्रकरणांचा तपास योग्यरीत्या झालेला नाही. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
- संजयकाका पाटील, खासदार