वरुड तालुक्यातील घटना : भाजप तालुकाध्यक्षासह चार जण अटकेत वरुड (जि. अमरावती) : चार दिवसांपूर्वी अपहरण करुन ३३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आणि शेतात मृतदेहाला पेटवून देण्यात आले. तसेच त्याच्या मालकीची कार मध्य प्रदेशच्या हद्दीत नेऊन तिथे कारलाही पेटवून देण्यात आले. या संपूर्ण घटनेचा उलगडा रविवारी सायंकाळी झाला. याप्रकरणी भाजपच्या वरुड तालुकाध्यक्षासह चार जणांना वरुड पोलिसांनी अटक केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.भाजपाचा वरुडचा तालुकाध्यक्ष योगेश घारड, राम दुर्गे, दिनेश बारस्कर, राम बिजवे अशी आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींना वरुड पोलिसांनी अटक केली असून घटनेत वापरण्यात आलेली एम.एच. ३१ ए.जी. ६२९९ ही जीप गाडी जप्त करण्यात आली आहे. स्थानिक पांढुर्णा चौक परिसरातील नितीन बैस (ठाकूर) असे मृताचे नाव आहे. हा युवक १७ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार वरुड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तो याच दिवशी स्वत:च्या कारने चालक रमाकांत ब्राह्मणे याला घेऊन मुलताईच्या दिशेने गेला होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. पोलिसांनी मुलताई मार्गाने शोध घेतला असता मध्य प्रदेशातील सौंसर-सावनेर रस्त्यावर त्याची कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असता अनेक धागेदोरे गवसले. पोलिसांनी सर्वप्रथमनितीन बैस याचा कारचालक रमाकांत ब्राह्मणे याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याबाबत पोलीस सूत्रानुसार, नितीन बैस व भाजपाचा तालुकाध्यक्ष योगेश घारड या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद होता. योगेशने आपल्या साथिदारांसह नितीनला संपविण्याची योजना आखली. यासाठी नितीनचा वाहन चालक रमाकांत याची मदत घेण्यात आली. रमाकांतच्या मदतीने नितीनला त्याच्याच कारमध्ये मुलताई मार्गाने नेण्यात आले. या मार्गावर आधीच आरोपी दबा धरुन बसलेले होते. नितीन कारने येताच आरोपींनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवून आपल्या वाहनात बसवून घेतले. रमाकांतला धाकदपट केल्याचे नाटक करुन त्याला पिटाळून लावले. त्यानंतर आरोपींनी सर्वप्रथम नितीनची कार पेटविली व नितीनला मारहाण करीत योगेश घारड याच्या मालकीच्या रोशनखेडा येथील शेतात नेण्यात आले. तिथे त्याची हत्या करुन मृतदेह जाळून टाकण्यात आला. नितीनचा वाहन चालक रमाकांत याच्या या माहितीच्या आधारे वरुड पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून घटनेत वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पुरुषोत्तम कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंजुनाथ सिंगे, ठाणेदार अर्जुन ठोसरे, सहायक पोलीस निरीक्षक शेळके, चांदूरे, प्रदीप पावडे, विजय शेवतकर करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
अपहरण करुन युवकाची क्रूर हत्या
By admin | Published: September 22, 2014 12:50 AM