ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 19 : सिद्धेश्वर तलाव परिसरातील तीन अल्पवयीन मुलींचे पार्टी करण्याच्या नावाखाली अपहरण केल्यानंतर त्यांना बियर पाजून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या दोन तरुणांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी मोठया कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्या तिसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरणानंतर घरी परतलेल्या एका मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या १४ तासांमध्ये उर्वरित दोघींची सुखरुपपणे सुटका केल्याने त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सौरभ सुंदर आबोरे (१८), खलील जावेद खान (१९) आणि धीरज (१६, रा. तिघेही ओवळा, कासारवडवली, ठाणे) अशी याप्रकरणी अटक केलेल्या तीन कथित आरोपींची नावे आहेत. खलीतची सिद्धेश्वर तलाव भागातील शिवांगी (१६, नावात बदल आहे) या मुलीशी अलिकडेच ओळख झाली होती. त्याने धीरज आणि सौरभ या अन्य दोन मित्रांशी तिच्या १३ आणि १६ वर्षांच्या मैत्रिणींशी ओळख घडवून आणली.
गेल्या १५ दिवसांतच मैत्री झाल्याची संधी साधून या तीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना १७ जुलै रोजी सौरभच्या घरी पार्टी करण्याचे अमिष दाखविले. रात्री ११ पर्यंत परत आणून सोडू, असेही त्यांना सांगितल्याने त्यांनी तयारी दर्शविली. त्यांना दुचाकीवरुन घेऊन हे सायंकाळी ४ वा. च्या सुमारास सिद्धेश्वर तलाव भागातून गेले. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिथे पार्टी केली. जेवण केले. त्याबरोबर मुलींना त्यांनी आग्रह करुन बियरही पाजली. रात्री ९.३० ते पहाटे ४.३० पर्यंत नृत्य करीत त्यांच्याशी गैरवर्तनही केले. नशेत असल्यामुळे या मुलींनाही कसलेच भान राहिले नाही. इकडे मुलींच्या पालकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर तलाव भागात गर्दी झाल्याचे पाहून नौपाडा पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने याबाबतची चौकशी केली, तेंव्हा तीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली. यातील एका मुलीच्या वडीलांनी एका दुचाकीस्वाराबरोबर मुलीला जातांना पाहिलेही होते. परंतू, दुचाकीचा क्रमांक नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा संभ्रम वाढला होता. रात्री ११ पर्यंत मुली घरी न परतल्यामुळे अखेर याप्रकरणी तीन्ही मुलींच्या पालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. उपनिरीक्षक तृप्ती खळदे आणि प्रशांत लोंढे या दोन पथकांनी शहरातील वेगवेगळया भागासह त्यांचे मित्र, मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली. त्यांचे मोबाईल, व्हाटसअॅप, फेसबुक अकाउंटही तपासण्यात आले. दरम्यान, १८ जुलै रोजी (मंगळवारी) या तिघींपैकी एक १३ वर्षाची मुलगी घरी परतली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली तेंव्हा या ‘पार्टी’ प्रकरणाचा उलगडा झाला. तोपर्यंत या मुलांनी मुलींबरोबर मौज केल्यानंतर उपवन परिसरात त्यांना पहाटे ५ वा. च्या दरम्यान घेऊन गेले.
सकाळी ६ वा. च्या दरम्यान उपनिरीक्षक लोंढे, खळदे आणि महिला हवालदार फर्नांडीस यांनी सौरभचे घर गाठले. घरात झडती घेतली, तिथे त्यांना आक्षेपार्ह साधनांसह दारुच्या बाटल्याही मिळाल्या. पण या मुलीं मिळाल्या नाही. त्यांचे मोबाईल बंद असतांनाही उपनिरीक्षक केकाण यांच्या मदतीने टॉवर लोकेशन घेऊन उपनिरीक्षक लोंढे यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उपवन भागातून ताब्यात घेतले. संपूर्ण चौकशीनंतर रात्री ८.३० वा.च्या सुमारास सौरभ आणि खलीत यांना अटक केली. तर धीरजला मात्र बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण (३६३), विनयभंग (३५४) आणि पोक्सो -८ (अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे तसेच गैरवर्तन) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन्ही मुलींना आता वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा कसे याबाबतचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी ‘लोकमत’ सांगितले.