बंगळुरू - राज्यासह देशभरात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती चिंताजनक आहे. तेलगी गेल्या 11 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्याचा मृत्यू झाला नसून त्याल व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे म्हटले आहे. अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र तेलगीच्या जावयाने त्याच्या मृत्यूचे वृत्त फेटाळले आहे. अब्दुल करीम तेलगी हा मुळचा कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील रहिवासी आहे. 80 च्या दशकात तो रेल्वेस्टेशनवर शेंगदाणे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्यानंतर त्याने बनावट स्टॅम्प पेपर विक्री सुरू केली. 2001 साली नोव्हेंबरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. 2002-03 च्या दरम्यान बनावट स्टॅम्प पेपर रॅकेट प्रकरणी विशेष तपास पथकाने अनेक दूरध्वनींवर त्याचे संभाषण टेप केले होते. त्यानंतर कोट्यवधीच्या स्टॅम्पपेपर घोटाळ्या प्रकरणी तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते.
बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी न्यायालयाने 2007 साली तेलगी याला 30 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार तेलगी आपल्या एजंटांसोबत मिळून बनावट स्टॅम्प पेपर बनवत असे. त्यानंतर हे स्टॅम्प पेपर बँका, वीमा कंपन्या आणि ब्रोकरेज फर्म्सना विक्री केले जात.
कारावासाबरोबरच तेलगीवर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात 7 जून 2003 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये तेलगीने सनसनाटी खुलासे केले होते. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथून 2200 कोटी आणि कफ परेड येथून 800 कोटी रुपायांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले होते. त्यानंतर तेलगीविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.