बंगळुरु - कोटयावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीचे गुरुवारी बंगळुरु येथील रुग्णालयात निधन झाले. मागच्या काही दिवसांपासून तेलगीची प्रकृची चिंताजनक बनली होती. तेलगी तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर न्यायालयाने त्याला 30 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. मागच्या आठवडयात त्याला बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अब्दुल करीम तेलगी हा मुळचा कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील रहिवासी. 80 च्या दशकात तो रेल्वेस्टेशनवर शेंगदाणे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्यानंतर त्याने बनावट स्टॅम्प पेपर विक्री सुरू केली. 2001 साली नोव्हेंबरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. 2002-03 च्या दरम्यान बनावट स्टॅम्प पेपर रॅकेट प्रकरणी विशेष तपास पथकाने अनेक दूरध्वनींवर त्याचे संभाषण टेप केले होते. त्यानंतर कोट्यवधीच्या स्टॅम्पपेपर घोटाळ्या प्रकरणी तेलगीला दोषी ठरवण्यात आले होते.
बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी न्यायालयाने 2007 साली तेलगी याला 30 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेलगी आपल्या एजंटांसोबत मिळून बनावट स्टॅम्प पेपर बनवत असे. त्यानंतर या स्टॅम्प पेपरची बँका, वीमा कंपन्या आणि ब्रोकरेज फर्म्सना विक्री केली जात असे.
कारावासाबरोबरच तेलगीवर 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात 7 जून 2003 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये तेलगीने सनसनाटी खुलासे केले होते. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथून 2200 कोटी आणि कफ परेड येथून 800 कोटी रुपायांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले होते. त्यानंतर तेलगीविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.