शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली असल्याचे समोर आले आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. "पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.
यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत सत्तार यांना अल्टीमेटम दिला आहे. "सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार नावाच्या वाह्यात व्यक्तीनं सुप्रिया सुळेंबाबत जो शब्द वापरलेला आहे, त्यासाठी सत्तार यांनी २४ तासात सुप्रिया सुळे यांची नाक घासून माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. सत्तारांना आम्ही त्यांची लायकी दाखवून देऊ" असं ट्विटमध्ये म्हटले आहे.