- मोसीन शेख
मुंबई: महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. तर मराठवाड्यातून शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदी वर्णी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारीला त्यांचा वाढदिवस असून त्यापूर्वीच दोन दिवस अगोदरच मंत्रिपदाच्या निमित्ताने त्यांना 'मातोश्री'चं अनोखं गिफ्ट मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे शिवसेना पक्षातून सुद्धा अनेक नेत्यांचे नावे चर्चेत होते. त्यात औरंगाबादमधून आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र आज होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
कोण आहेत अब्दुल सत्तार
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तिसऱ्यांदा आपला गड कायम ठेवत विजय मिळवणारे अब्दुल सत्तारांचे नाव विविध कारणाने राज्याच्या राजकरणात नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. २०१६ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सत्तार हे कॅबिनेट मंत्रीपदी राहिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत विजय सुद्धा मिळवला. त्यातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेल्या आमदारांपैकी एकमेव मुस्लीम आमदार म्हणून सत्तार ठरले आहेत.