औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या काही दिवसांत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. सत्तारांच्या नाराजीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मात्र सत्तारांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही असा दावा केला आहे.
अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या बंद दरवाज्याआड चर्चा झाली. या चर्चेनंतर खोतकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत अब्दुल सत्तार यांची चर्चा झाली आहे. त्यांची नाराजी काही नाही, उद्या दुपारी साडेबारा वाजता अब्दुल सत्तार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही, सत्तारांचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत मतभेद होते. ते दूर झाले आहेत. राजीनामा दिल्याच्या अफवा आहेत असा दावाही खोतकर यांनी केला.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नाराज समोर येतील असं विरोधकांकडून सांगण्यात येत होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तारांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे सरकारवर तोफ डागली होती. 'महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे अशा शब्दात त्यांनी भाष्य केलं होतं.
तर सत्तारांपाठोपाठ मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचीही नाराजी समोर आली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. जालना विधानसभा मतदार संघातून आपण तीनवेळा विजय मिळवला. अर्जुन खोतकर यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असताना जालना जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवले. एवढचं नाही तर जालना नगर परिषदही काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. परंतु, यावेळीही पक्षाकडून डावलण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी डावलून पक्षाने आपल्यावर मर्यादा घातल्याचे सांगत गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यामुळे खातेवाटपापूर्वीच ठाकरे सरकारवर नाराजीचं ग्रहण लागलं असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आघाडीला दुसरा धक्का; काँग्रेस आमदार गोरंट्यालही राजीनाम्याच्या तयारीत
आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा
...ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...