मुंबई - पैठण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकांमाचा धडाकाच लावला होता. मात्र शुक्रवारी भुमरेंच्या पैठण मतदारसंघात चक्क सिल्लोड मतदारसंघातील माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी विकास कामांचे उद्घाटनकरून नारळ फोडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अब्दुल सत्तार हे भुमरेंसाठी मैदानात उतरले असल्याची चर्चा पाहायला मिळाली.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र त्यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाकाच लावला असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी चक्क भुमरे यांच्या मतदारसंघात जाऊन विकास कामांचे उद्घाटन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी पैठण तालुक्यातील पिम्प्रिराजा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
सत्तार यांना मानणारा एक मोठा वर्ग पैठण तालुक्यात आहे. त्यामुळे निश्चितंच याचा फायदा भुमरे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. आधी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा सत्तार यांचा छुपा पाठींबा भुमरे यांना असल्याच्या चर्चा पाहायला मिळायच्या. त्यामुळे आता थेट पक्षातच आल्याने सत्तार हे भुमरे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.
सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांचा जिल्ह्यातील राजकरणात मोठा वाटा होता. पैठण तालुक्यात सुद्धा त्यांचे मोठ्याप्रमाणावर संघटन होते. जातीचे समीकरणाचा विचार केला तर, मुस्लीम समाजातील मोठा वर्ग त्यांना मानणार होता. त्यामुळेचं सत्तार हे संदीपान भुमरेंसाठी मैदानात उतरले असल्याचे बोलले जात आहे. तर त्यातच आता सत्तार सुद्धा शिवसेनेत गेले असल्याने, आगामी काळात भुमरेंच्या प्रचारात सत्तार दिसले तर आश्चर्य वाटू नयेत.
संदीपान भुमरे ( शिवसेना आमदार पैठण )
माजी आमदार अब्दुल सत्तार आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. मात्र आता तर ते शिवसेनेतचं आले आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी प्रयत्न करणारचं याची मला खात्री असून विश्वास सुद्धा आहे. तर निवडणुकीच्या प्रचारासाठी सुद्धा ते पैठण मतदारसंघात येणार आहेत.