मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वादा पाहायला मिळत आहे. यातच खासदार नवनीत राणा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचार करणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर आता महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले आहे.
'भाजपची सुपारी घेऊन बोलत आहेत'बीडमध्ये माध्यमांशी बोलत असताना अब्दुल सत्तार म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवेल," असे थेट आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच, ''राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत, त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,'' असंही ते म्हणाले.
'नारायण राणेंवरही टीका'यावळी अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, यांच्यावरही निशाणा साधला. "राणे हे चार आणेसारखी गोष्ट करतात. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते त्यांनी केले. त्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात," असं सत्तार म्हणाले.