अब्दुल सत्तार अडचणीत, गायरान जमिनीच्या वाटपावरून अजित पवारांचे गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:28 PM2022-12-26T13:28:25+5:302022-12-26T13:29:03+5:30
Ajit Pawar Allegations on Abdul Sattar : आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. गायरान जमितीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे.
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी झाली आहे. आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. गायरान जमितीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. जर अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणात राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
शिंदे सरकारमधील कृषिमंत्री आणि आधीच्या सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवार यांनी गंभीर आरोप केले. अजितदादा म्हणाले की, तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनी वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवलं. तसेच तत्कालिन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा दावा अजित पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध वाटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. तोपर्यंत राज्यात सत्तांतर होऊन हे शिंदे सरकार सत्तेवर आलं होतं. या पत्रातून वादग्रस्त आदेशाची अंमलजबाणी केल्यास सुप्रिम कोर्टाचा अनादर होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं होत. तसेच योग्य दिशानिर्देश देण्याची मागणी केली होती. मात्र माझ्या माहितीप्रमाणे या पत्रावर अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ही जमीन ३७ एकर असून, त्याची दिडशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. ही वाशिमला लागून आहे. या प्रकरणात महसूल राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय, राज्य सरकारचा निर्णय सर्व बाबी समोर असताना त्यांनी एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे महसूलराज्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.