मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र आता सत्तार हे आपल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
तर आता अब्दुल सत्तार हे राज्यमंत्रिपदाबरोबर आमदारकीचा सुद्धा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांचे अजून खातेवाटप सुद्धा झाली नाही, मात्र त्या आधीच नाराजीनाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.