मुंबई: ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा दाऊद गँगशी संबध असल्याचे आरोप 'सामना'च्या मुखपत्रातून 1994 ला करण्यात आला होता. मात्र आता त्याच सत्तारांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेतल्याने शिवसेनेवर टीका होत आहे. तर सामनामधून छापुन आलेल्या त्या बातमीचा फोटो सुद्धा सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
1994 मध्ये झालेल्या सिल्लोडच्या नगरपालिका निवडणुकीत अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष झाले होते. तर त्यावेळी त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार उमेश कुलकर्णी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
11 जून 1994 ला छापुन आलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हंटले होते की, 'मुंबई बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी व शहानवाज खान यांच्याशी जवळीक संबध असलेले अब्दुल सत्तार हे स्थानिक राजकीय नेत्यांच्या पाठींब्याच्या जोरावर गुन्हेगारी व राजकीय खेळीत यशस्वी ठरले आहे. तर सत्तार यांचे दाऊद गँगशी संबध असल्याचे कळते', असा आरोप सामनामधून त्यावेळी करण्यात आला होता.
मात्र ज्या सत्तारांवर दाऊद गँगशी संबध असल्याचे आरोप करण्यात आले, त्याच सत्तारांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद कसे दिले? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीलाही अब्दुल सत्तार यांनी विरोध केला होता. याबाबतच्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.