मुंबई - भाजपालाशिवसेना संपवायची आहे. बंडखोरांना पक्षही चोरायचाय आणि माझे वडीलही चोरायला निघालात? ही कसली मर्दुमकी, कसली बंडखोरी? ही बंडखोरी नव्हे तर हरामीपणा आहे. तुम्ही दरोडेखोर आहात, हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुखांचा माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. आपल्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्या आणि मते मागा अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. तसेच तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं म्हटलं आहे. याला आता बंडखोर गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"मी 42 वर्षांपासून राजकारणात आहे. 25 वर्षांपासून आमदार आणि तीन वेळा मंत्री झालो, ते एकदाच मुख्यमंत्री झाले" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मराठवाड्यातील एकही आमदार पडणार नाही, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे. "येत्या 31 तारखेला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यात येणार आहेत. सर्व जनता एकनाथ शिंदे यांची वाट पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात शिंदे यांचा एकही आमदार पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षांपासून आमदार, 3 वेळा मंत्री झालो. ते एकदाच मुख्यमंत्री झाले आहेत" असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शक्तिप्रदर्शन करत सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधत आहेत. त्याचसोबत हिंमत असेल तर मर्दासारखं राजीनामा द्या, पुन्हा निवडून येऊन दाखवा असं आव्हान देत आहेत. आता आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला शिंदे गटातील पहिल्या आमदाराने थेट प्रतिआव्हान दिले आहे. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी मला परवानगी दिली तर मी उद्याच राजीनामा देतो.
राजीनामा देऊन पहिली निवडणूक त्यांना घेऊन दाखवणार आहे. मी किती मतांनी निवडून येतो हे त्यांना दाखवून देणार आहे. 31 तारखेला मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लाखो लोक तेव्हा स्वागतासाठी येतील असा दावा सत्तार यांनी केला आहे. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात कधी आले नाही. बाळासाहेबांचे अनुयायी एकनाथ शिंदे आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती होती. तो धर्म आम्ही पाळतोय. नेत्याला बदनाम करायचं आणि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असं दुटप्पी बोलायचं हे राजकारणात चालत नाही असं सत्तार म्हणाले.