Abdul Sattar Supriya Sule, Jayant Patil: महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना एक अपशब्द उच्चारला गेला. ५० खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर संताप व्यक्त करत सत्तारांवर टीका केली.
जयंत पाटील संतापले...
मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. महिला लोकप्रतिनिधी विषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.
राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध
अब्दुल सत्तारांनी 24 तासांत माफी मागावी, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले होते. तसेच, 'दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला होता.
भाजपाच्या चित्रा वाघ म्हणाल्या...
"महिलांचा अवमान करणं किंवा महिलांबद्दल अपशब्द उच्चारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे केवळ अब्दुल सत्तारच नव्हे तर कोणत्याही नेतेमंडळींनी असे शब्द वापरू नयेत असे माझे मत आहे. पण ही सारी घटना झाली त्याचं कारण ५० खोकेंवरून केली जाणारी टीका. '५० खोके सत्तारांकडे आहेत, त्यातले त्यांनी मला द्यावेत' असं बोलून राज्यभरात या आमदारांच्या विरोधात राळ उठवली जात आहे. त्यां आमदारांना अपमानित करण्याचं काम सुरू आहे. या साऱ्याचा राग म्हणून आलेले ते प्रत्युत्तर आहे. महाविकास आघाडीचे नेते महिलांचा अपमान करत होते. संजय राऊतांनी कंगना रानौतबद्दल हरामXX म्हणण्याइतकी मजल मारली होती. हे सारे आमच्या लक्षात आहे. पण तरीही शिंदे-फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री, नेते किंवा पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये," असे स्पष्ट शब्दांत चित्रा वाघ म्हणाल्या.