मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवणारे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे सर्वच राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अब्दुल सत्तार यांचा विजय झाला असून अधिकृत घोषणा बाकी आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्तार यांनी काँग्रेसचे हात सोडत पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना सेनेकडून उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कैसर आझाद शेख व अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर रिंगणात होते.
सुरवातीपासूनच आघाडी घेतलेल्या सत्तार यांनी शेवटच्या फेरीत 24 हजार 465 मतांनी विजय मिळवला आहे. तर पालोदकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे सिल्लोडच्या जनतेने पुन्हा अब्दुल सत्तारांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.